फलटण, प्रतिनिधी :
“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेचा प्रत्यय देणारी मानवतेची हृदयस्पर्शी घटना फलटण तालुक्यात घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे लाखो रुपयांच्या शस्त्रक्रियेचा खर्च पेलणे अशक्य झालेल्या जाधव आणि एडवे या दोन सर्वसामान्य कुटुंबांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदतीचा हात देत संपूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करून दिली. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
हातावर पोट असलेल्या या दोन्ही कुटुंबांसमोर पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या शस्त्रक्रियेचे मोठे संकट उभे ठाकले होते. अशा कठीण प्रसंगी प्रहार संघटना फलटण तालुकाध्यक्ष सागर गावडे आणि रुग्णसेवक बापूराव माने यांनी सातारा संपर्क प्रमुख गौरव जाधव व पुणे जिल्हाध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्याशी तातडीने संपर्क साधला.
त्यांच्या समन्वयातून पुण्यातील नामांकित रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित होता, त्या शस्त्रक्रियेसाठी संबंधित कुटुंबांना रुग्णालयात एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. संपूर्ण उपचार मोफत करून देण्यात आल्याने दोन्ही कुटुंबांनी प्रहार संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संकटाच्या काळात केवळ आर्थिक मदत नव्हे, तर धीर, आधार आणि माणुसकीची साथ देणे हीच खरी जनसेवा असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले. समाजातील गरजू, गोरगरीब आणि संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची परंपरा प्रहार संघटनेने पुन्हा एकदा जपल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवतेचे दर्शन घडविणारी ही कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “सेवाच आमची ओळख, जनतेचाच आमचा श्वास” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार झाल्याची भावना व्यक्त होत आहे.





