फलटण :आपलं फलटण प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच विशेष सहाय्य योजनांतील सर्व लाभार्थ्यांनी Beneficiary Satyapan App (BSA) द्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (DLC) ऑनलाइन पद्धतीने तातडीने सादर करावे, असे आवाहन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.
शासनाच्या दि. ७ जुलै २०२६ रोजीच्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व अपंग निवृत्ती वेतन योजनांतील पात्र लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लाभार्थी स्वतः मोबाईलद्वारे किंवा नातेवाईक, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून BSA अॅप वापरून घरबसल्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. या प्रणालीमुळे कार्यालयीन फेऱ्या टाळून वेळेची बचत होणार असून लाभाचे वितरण अधिक सुलभ आणि नियमित होणार आहे.
विहित मुदतीत हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानाच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी तातडीने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सर्व लाभार्थ्यांना कोणतीही दिरंगाई न करता BSA अॅपद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करून शासनाच्या योजनांचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.





