आपलं फलटण प्रतिनिधी
सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागाचे भवितव्य बदलू शकणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘फ्लड डायव्हर्जन’ (Flood Diversion) योजनेला मोठी गती मिळाली असून, या प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षणासाठी 24 कोटी 5 लाख 67 हजार 15 रुपयांच्या निधीस महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा सोलापूर वमराठवाड्यातील दुष्काळी जनतेला दिलेले “रिटर्न गिफ्ट” असल्याची भावना व्यक्त करत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व राज्य सरकारचे आभार मानले.आमदार सचिन पाटील ज्येष्ठ नेते प्रह्लाद पाटील( तात्या),शिवरूपराजे खर्डेकर,नरसिंह निकम,माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांची उपस्थिती होती
रणजितसिह पुढे म्हणाले की, कोयना, कृष्णा, कुबी, कासारी आदी नद्यांमधील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याची संकल्पना त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
या योजनेअंतर्गत पावसाळ्यातील 90 दिवसांत सुमारे 51 टीएमसी अतिरिक्त पाणी सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यात वळविणे शक्य होणार आहे. यापूर्वी विविध तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा अभ्यास केला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना होती. त्यामुळे या योजनेला तत्त्वतः अनुकूलता मिळाली.
सुमारे 17 ते 18 हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात 110 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचे नियोजन आहे. या बोगद्यासाठी खडकांची तपासणी, ड्रिलिंग, भूगर्भीय चाचण्या आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) अर्थसहाय्य करण्यासही अनुकूलता दर्शविल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
या प्रकल्पामुळे सापतेवाडी ते आसू दरम्यान उभारण्यात येणाऱ्या बोगद्यामुळे बॅकवॉटर निरा गावापर्यंत सुमारे 20 ते 25 किलोमीटरपर्यंत पोहोचेल. त्यातून धोम-बलकवडी, निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा आणि निरादेवघर या सिंचन व्यवस्थेत सुमारे पाच टीएमसी पाणी इंजेक्शन पद्धतीने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे कालवे वर्षभर पाण्याने भरलेले राहण्यास मोठी मदत होईल.
याशिवाय फलटण शहरातील बाणगंगा नदी वर्षभर प्रवाही ठेवण्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उपळवे येथून सुमारे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बानगंगा वर्षभर प्रवाहित राहुल परिसराचा पाणी प्रश्न सुकर होऊ शकतो
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, “सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण होऊन हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला, तर सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी दिलासा मिळेल. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा शाश्वत वापर करून लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची क्षमता या योजनेत आहे.”
शासनाने सर्वेक्षणास मंजुरी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे सातारा, सोलापूर व मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.





