आपलं फलटण प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त १७ जुलै २०२६ रोजी पालखीचे फलटण विमानतळ येथे आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर पालखीसोबतच्या वाहनांची वाहतूक सुरक्षित, सुरळीत व विनाअडथळा पार पडावी यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याने विशेष वाहतूक आराखडा जाहीर केला आहे. नागरिक, वारकरी व वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी पालखीसोबतची वाहने तांबमाळ येथील निरा उजवा कालवा नवीन पालखी मार्गावरील उड्डाणपुलाचा वापर करून चौधरवाडी, सस्तेवाडी, कांबळेश्वर, धुळदेव उड्डाणपुलाखालून यू-टर्न, बारामती रोड उड्डाणपूल, सोमवार पेठ, नाना पाटील चौक, दहिवडी चौक, डी.एड. चौक, गिरवी नाका मार्गे फलटण पालखी मुक्कामस्थळी पोहोचतील.
या संपूर्ण मार्गावर पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग तसेच वाहतूक वळविण्याचे (डायव्हर्शन) पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत.

दरम्यान, १८ जुलै रोजी पालखी फलटण विमानतळावरून विडणी विसाव्याकडे व बरड मुक्कामासाठी प्रस्थान करताना पालखीसोबतच्या वाहनांनी दहिवडी चौक, कोळकी तिकटणे, सोनवडी, वडले (फौजीनगर), माझेरी मार्गे विडणीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंप्रद येथील दुपारच्या जेवणाच्या विसाव्यासाठी जाणाऱ्या वाहनांनी वडले गावातून डावीकडे वळून पिंप्रद पालखी विसावा स्थळी जावे. तसेच बरड मुक्कामासाठी जाणाऱ्या वाहनांनी पिंप्रद मार्गे मिरडे फाटा येथून डावीकडे वळून बरड मुक्कामस्थळी जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
फलटण शहर पोलीस ठाण्याने नागरिक, वारकरी, वाहनचालक तसेच पालखीसोबतच्या सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून पोलीस यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.





