फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) “गॅलेक्सी मल्टिस्टेटचे ध्येय केवळ आर्थिक व्यवहार करणे नसून, प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू भागीदार बनणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे,” असा विश्वास गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे संस्थापक व चेअरमन तथा के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक सचिन यादव यांनी व्यक्त केला.
के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत कार्यरत गॅलेक्सी मल्टिस्टेटच्या आठव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच बारामती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शाखेचे उद्घाटन सचिन यादव आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, सभासद, ग्राहक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत बारामतीमध्ये गॅलेक्सी मल्टिस्टेटची ही दुसरी शाखा सुरू झाली असून, महाराष्ट्रातील शाखा विस्ताराचा वेग कायम राखत संस्थेने आता आठव्या शाखेपर्यंत मजल मारली आहे. पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आणि देशातील अनेक राज्यांत गॅलेक्सीचे शाखाजाळे वेगाने विस्तारत असून, विश्वासार्ह आणि दर्जेदार आर्थिक सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा संकल्प अधिक बळकट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना सचिन यादव म्हणाले, “भविष्यात आणखी अनेक शहरांमध्ये शाखा सुरू करून अधिकाधिक नागरिकांना आधुनिक व विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. गरजेच्या वेळी तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी गॅलेक्सीची गोल्ड लोन सुविधा ग्राहकांसाठी विशेष उपयुक्त ठरत आहे.”
के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजने कृषी, जैविक शेती, निर्यात, सहकार आणि आयुर्वेद अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. करार शेतीच्या माध्यमातून २५ हजार शेतकऱ्यांना जोडत युरोपियन देशांमध्ये दररोज १५ टन कृषीमाल निर्यात करण्याचा टप्पा समूहाने गाठला आहे. रोजगारनिर्मिती, शेतकरी विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देत दोन हजारांहून अधिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. समूहाची वार्षिक उलाढाल १७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, फलटणमध्ये ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता बारामतीमध्येही संस्थेने आपली भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी गॅलेक्सी मल्टिस्टेटच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे कौतुक करत, बारामतीसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात दुसऱ्या शाखेचा शुभारंभ हा नागरिकांसाठी लाभदायी ठरणार असून, अधिक दर्जेदार व विश्वासार्ह आर्थिक सेवा स्थानिकांना सहज उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास गॅलेक्सी पतसंस्थेच्या संचालिका सुजाता सचिन यादव, माजी नगराध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, किरण तावरे, फलोत्पादन संघाचे चेअरमन वसंत घनवट, भाऊसाहेब काटे, ॲड. खारतोडे गॅलेक्सी संचालक परिवार हितचिंतक ठेवीदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






