आपलं फलटण प्रतिनिधी :पत्रकारांविषयी कथित आक्षेपार्ह व धमकीजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने फलटण येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
याबाबतचे निवेदन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यामार्फत नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांना देण्यात आले.
यावेळी अरविंद मेहता, अजय माळवे, यशवंत खलाटे, सुभाष भांबुरे, युवराज पवार, नासिर शिकलगार, पोपट मिंड, विनायक शिंदे, ॲड. रोहित अहिवळे, सुधीर अहिवळे, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, सचिन मोरे, विशाल शहा, मितेश खराडे, अभिजित सरगर, दीपक मदने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, वैभव गावडे, प्रशांत रणवरे, संजय गायकवाड, वैभव जगताप, बाळासाहेब ननवरे आणि शेखर जगताप यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून काही पत्रकार खासदार संजय दिना पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले असता, त्यांनी पत्रकारांशी अर्वाच्च भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून खासदार पाटील यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, खासदार पाटील यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा असताना पोलिसांच्या उपस्थितीतच कथित धमकी देण्यात आल्याने हा प्रकार अधिक गंभीर आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था तातडीने पुनर्विचार करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय, यापूर्वीही स्वतःकडे बॉम्ब असल्याचे तसेच हिंसक स्वरूपाची विधाने केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला असून, त्या वक्तव्यांचीही चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.






