आपलं फलटण: सातारा येथील छत्रपती श्री शाहू स्टेडियमवर झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने आक्रमक व दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत जिल्हा विजेतेपदावर नाव कोरले. या शानदार कामगिरीमुळे मुधोजीच्या संघाची गडहिंग्लज येथे होणाऱ्या विभागस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि. २८ सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत मुधोजीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच मैदानावर वर्चस्व राखले. पहिल्या सामन्यात वाई तालुक्याचा ३-० असा पराभव करत विजयी सलामी दिल्यानंतर उपांत्य फेरीत पाचगणीविरुद्ध रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ४-३ असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात कराड तालुक्याच्या बलाढ्य संघासमोरही मुधोजीच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ कायम ठेवत ५-३ असा दणदणीत विजय मिळवला. सलग तीन सामन्यांत दमदार कामगिरी करत मुधोजीने जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले आणि आता विभागीय स्पर्धेचे आव्हान स्वीकारले आहे.
संघाला ज्येष्ठ प्रशिक्षक संजय फडतरे व अमित काळे यांचे मार्गदर्शन लाभले. संकेत मठपती यांनी संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली.
मुधोजीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, सौ. पूजा पाटील, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडाप्रेमींनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. विभागस्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.






