काळज येथे ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
फलटण : आपलं फलटण वृत्तसेवा :
जीवनातील ७५ वर्षांचा प्रवास म्हणजे अनुभव, संघर्ष, कर्तृत्व आणि माणुसकीच्या नात्यांचा अनमोल ठेवा! अशा समृद्ध जीवनप्रवासाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी काळज (ता. फलटण) येथे श्री. मल्हारी शंकर गाढवे पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता एका समृद्ध जीवनप्रवासाचा गौरव, आपुलकीच्या नात्यांचा सन्मान आणि सामाजिक एकोप्याचा आनंद अनुभवण्याची संधी या सोहळ्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आयुष्याच्या वाटचालीत जपलेल्या संस्कारांचा, अनुभवांचा आणि माणुसकीच्या ऋणानुबंधांचा हा आनंदोत्सव ठरणार आहे.
या सोहळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, लोकप्रिय आमदार सचिन पाटील, पंचायत समिती फलटणचे सदस्य धनंजय साळुंखे पाटील, स्वराज्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर तसेच लोणंद पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी जायपत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात संत बाळूमामांचे चरित्रकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प. हरी महाराज गोफणकर (आनंदनगर) यांची कीर्तनसेवा होणार आहे. संतविचार, अध्यात्म, समाजप्रबोधन आणि जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या कीर्तनातून उपस्थितांना वैचारिक आणि आध्यात्मिक मेजवानी मिळणार आहे.
या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन समस्त गाढवे पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ काळज यांच्या वतीने करण्यात आले आहे. जीवनाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावर अनुभव, समाधान, आरोग्य आणि आनंदाची शिदोरी अधिक समृद्ध व्हावी, या सदिच्छेसह आयोजित या सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांचे सुपुत्र मनोहर गाढवे, माजी उपसरपंच सचिन गाढवे व समस्त गाढवे परिवार यांनी केले आहे.





