फलटण : आपलं फलटण :थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे ‘नांदी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहित्यिक विचारांची देवाणघेवाण, स्थानिक लेखकांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन आणि व्याख्यान-कथाकथन अशा विविध कार्यक्रमांनी हे संमेलन रंगणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण, श्री सद्गुरू प्रतिष्ठान आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी १ ते सायंकाळी ५.३० या वेळेत महाराजा आयकॉन सभागृह, डी. एड. चौकानजीक, फलटण येथे हे संमेलन होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे येथील स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रात पुस्तक व चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन तसेच स्थानिक लेखक सुरेश शिंदे, डॉ. महेश बर्वे आणि श्रद्धा वेलणकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. लेखिका स्व. सुलेखा सुरेश शिंदे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार धुमाळवाडी येथील समाजसेविका शोभाताई कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी ३.३० वाजता ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ या विषयावर ईश्वरपूर येथील प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान होणार आहे. याच सत्रात प्रा. रविंद्र कोकरे व प्रा. हिम्मत पाटील यांचे कथाकथन आणि स्थानिक लेखकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य आयोजनातून आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या सहसंयोजनातून जानेवारी २०२७ मध्ये पुणे येथे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी राज्यभर ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून फलटणमधील यंदाचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे संमेलन साध्या व छोटेखानी स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक लेखक, कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच वाचनसंस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, म.सा.प. फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे आणि कार्यवाह अमर शेंडे यांनी साहित्यप्रेमी, लेखक, कवी व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.





