फलटण : आपलं फलटण : सण-उत्सवांचा आनंद प्रत्येकाला मिळावा आणि समाजातील वंचित घटकांच्याही जीवनात आनंदाचे क्षण फुलावेत, या सामाजिक बांधिलकीतून मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था, फलटण (महाराष्ट्र राज्य) आणि कादंबरी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही बेघर, निराधार, मनोरुग्ण तसेच गरजू व्यक्तींसोबत दीपावली साजरी करण्यात आली. या उपक्रमामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

फलटण शहर व परिसरातील बेघर, निराधार, मनोरुग्ण आणि गरजू व्यक्तींना सणासुदीच्या काळात आनंद साजरा करण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागते. ही सामाजिक जाणीव ठेवून मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध सण अशा वंचित घटकांसोबत साजरे करीत आहे. यंदाच्या दीपावलीनिमित्त या व्यक्तींना कपडे, साड्या आणि दिवाळीचा फराळ देऊन त्यांना सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्यात आले.
याचबरोबर परराज्यातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या कोळसा कामगारांनाही या उपक्रमातून मदतीचा हात देण्यात आला. मध्य प्रदेशातील आलोट तालुक्यातील रतलाम जिल्ह्याच्या परिसरातील महिला, पुरुष कामगार आणि लहान मुलांना कपडे, साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांसह या कामगारांचीही दीपावली आनंदात साजरी झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा) हे सातत्याने बेघर, निराधार आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतात. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर समाजातील उपेक्षित घटकांनाही आपलेपणाची जाणीव करून देण्याचा संस्थेचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा), प्रा. मोरे मॅडम, अक्षय तावरे, मोहन आलगुडे, अनिल कुंभार, रविंद्र भिसे आणि सारिका घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या माणुसकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.






