आपलं फलटण | फलटण प्रतिनिधी
फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील धनगर समाजाला संचालकपदावर प्रतिनिधित्व मिळावे, ही मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत फलटण तालुक्यातील धनगर समाजाला संचालकपदाची संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांनी आपल्या पत्नी सौ कांताबाई रामभाऊ ढेकळे यांना संचालकपदाची संधी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना पत्र देऊन विमुक्त भटक्या जाती-जमाती (एनटी-सी) किंवा मजूर संस्था या प्रवर्गांपैकी एका जागेवर उमेदवारी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे साकडे घातले आहे.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी अनेकांना मिळाली; मात्र धनगर समाजाच्या वाट्याला संचालकपदाचे प्रतिनिधित्व आले नसल्याची बाब या निमित्ताने चर्चेत आली आहे. फलटणसह माण, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, कराड, सातारा आणि पाटण या तालुक्यांमध्ये धनगर समाजाची लक्षणीय लोकसंख्या असूनही या समाजाला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळाले नसल्याचा मुद्दा ढेकळे यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत या समाजाला प्रतिनिधित्व देऊन न्यायाची भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्याच्या राजकीय समीकरणांमध्येही या मागणीला विशेष महत्त्व आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे असे दोन आमदार आहेत. याशिवाय, तालुक्यातील राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. अशा परिस्थितीत पक्षाने सामाजिक प्रतिनिधित्वाचा विचार करून धनगर समाजाला संधी द्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपनेही या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी भावना समाजातून पुढे येत आहे.
रामभाऊ ढेकळे यांचा राजकीय आणि सहकार क्षेत्रातील अनुभवही या मागणीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सलग १५ वर्षे फलटण तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले असून, त्यानंतर सातारा जिल्हा कमिटीमध्येही योगदान दिले आहे. पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे. ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून गावपातळीवर काम करण्याबरोबरच फलटण पंचायत समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी आपली उमेदवारी निश्चित झाली होती; मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ऐनवेळी माघार घेतल्याचे ढेकळे यांनी पत्रात नमूद केले आहे. पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे यंदा त्यांच्या कुटुंबाला, विशेषतः त्यांच्या पत्नीला, संचालकपदाची संधी देताना पक्षाने त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचा आणि निष्ठेचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मकरंद आबा पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
धनगर समाजाचे प्रतिनिधित्व, फलटण तालुक्याचे राजकीय महत्त्व, राष्ट्रवादी काँग्रेससाठी ढेकळे यांनी केलेले योगदान आणि मागील निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाला दिलेला मान या सर्व बाबींचा विचार करून मंत्री मकरंद आबा पाटील या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास तालुक्यातील काही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. मात्र, उमेदवारीबाबत पक्षाचा अधिकृत निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही.
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत सामाजिक प्रतिनिधित्वाला प्राधान्य मिळणार का, धनगर समाजाच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळणार का आणि रामभाऊ ढेकळे यांच्या पत्नीला संचालकपदाची संधी मिळणार का, याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






