आपलं फलटण | फलटण
दुष्काळी परिस्थितीचे सावटामुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन फलटण नगरपरिषदेने शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यात तब्बल२० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेने जाहीर निवेदनाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार अल्-निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार फलटण शहरातील पाणीपुरवठ्यात दैनंदिन २० टक्के कपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शहरातील सर्व स्विमिंग पूल तसेच सर्व प्रकारची वाहने धुण्याची केंद्रे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या जाहीर आवाहनावर फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाण्याची बचत करण्याची गरज आहे.





