फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून फलटण नगरपरिषदेच्या वतीने शैक्षणिक प्रबोधन मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत लक्ष्मीनगर येथील महाराजा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
मेळाव्याचे उद्घाटन खासदार रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते होणार असून, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण न्यू शुगर साखरवाडी कारखान्याचे माजी चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, सद्गुरू महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटणचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील जाधव, नगरसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात “आधुनिक शिक्षण पद्धती आणि शिक्षकांची भूमिका” या विषयावर एमकेसीएलचे संचालक व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत मार्गदर्शन करणार आहेत. तर “बदलत चाललेली शिक्षण व्यवस्था व शिक्षकांची बांधिलकी” या विषयावर शिवम परिवाराचे प्रमुख व प्रसिद्ध वक्ते इंद्रजीत तथा काकासाहेब देशमुख विचार मांडणार आहेत.
बदलत्या काळातील शिक्षणव्यवस्था, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील शिक्षकांची भूमिका आणि शिक्षकांची सामाजिक बांधिलकी याबाबत या मेळाव्यात मार्गदर्शन मिळणार असल्याने शिक्षण क्षेत्रासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षकवर्ग तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी केले आहे.
या उपक्रमास पंचायत समिती शिक्षण विभाग, फलटण नगरपरिषद शिक्षण समिती, महाराजा व सद्गुरू उद्योग समूह, श्रीराम एज्युकेशन सोसायटी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटण यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.






