फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी :
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आता थेट महावितरणच्या वीज वाहिनीच्या खांबांचाच आधार घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार फलटण तालुक्यातील तरडगाव ते लोणंद दरम्यानच्या पालखी महामार्गावर निदर्शनास आला आहे. एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स वीज खांबांवर लावण्यात आले असून, सार्वजनिक मालमत्तेचा अशा पद्धतीने वापर होत असतानाही संबंधित यंत्रणा गप्प का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पालखी महामार्ग हा कायम वाहनांची मोठी वर्दळ असलेला प्रमुख मार्ग आहे. अशा ठिकाणी वीज वाहिनीच्या खांबांवर अनधिकृतपणे फ्लेक्स लावणे केवळ सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण नाही, तर संभाव्य सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब आहे. फ्लेक्स लावण्यासाठी खांबावर चढताना वीज वाहिनीच्या संपर्कात येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात अशा प्रकारांचे अनुकरण वाढले, तर त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीपुरते मर्यादित न राहता इतर नागरिक, वाहनचालक तसेच वीज यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करणारे कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदारांनाही भोगावे लागू शकतात.
एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावण्यास मुभा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले, तर उद्या प्रत्येक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ता, व्यक्ती, व्यावसायिक, व्यापारी आदींनी आपल्या व्यक्तिगत तथा व्यावसायिक जाहिरातीसाठी अशा प्रकारे वापर करण्यास सुरुवात केली तर काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियम हे सर्वांसाठी समान असतील, तर ‘बड्या धेंडांसाठी वेगळे आणि सर्वसामान्यांसाठी वेगळे’ असे नियम आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
किरकोळ बाबींवरही सर्वसामान्यांना नियमांची आठवण करून देणाऱ्या यंत्रणा आणि त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावशाली व्यक्तींच्या बाबतीत मात्र मौन बाळगायचे का? नियमांची अंमलबजावणी करताना पद, पक्ष किंवा प्रतिष्ठा पाहिली जाते का? याचे उत्तर संबंधित यंत्रणांनी देणे गरजेचे आहे.

महावितरणच्या मालकीच्या वीज खांबांचा वापर वैयक्तिक अथवा राजकीय प्रसिद्धीसाठी करण्यास परवानगी आहे का? असल्यास ती कोणत्या नियमांनुसार? संबंधितांना कोणाची परवानगी मिळाली? आणि परवानगी नसेल तर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे वीज खांबांवर अनधिकृत फलक लावण्याची प्रथा वाढत गेल्यास भविष्यात महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामातही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. खांबावर फलक, बॅनर, दोरखंड किंवा इतर साहित्य लावले गेल्यास तांत्रिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त अडचणी आणि जोखीम निर्माण होऊ शकते.
प्रसिद्धीचा हव्यास; नियमांचा विसर!
स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांचा आणि विशेषतः धोकादायक विद्युत खांबांचा वापर करण्याची प्रवृत्ती समाजासाठी निश्चितच चिंताजनक आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असताना वीजेच्या खांबांवरच फ्लेक्स लावण्याची गरज काय? असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
अशा प्रकारांकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाले, तर त्यातून ‘एकाने केले म्हणून आपणही करू’ अशी मानसिकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने ‘कोणी लावले?कोणाच्या वाढदिवसाचा फलक आहे? यापेक्षा ‘सार्वजनिक मालमत्तेवर अनधिकृत फलक लावला आहे का?’ या निकषावर कारवाई करणे आवश्यक आहे.
संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून अनधिकृत फ्लेक्स हटवावेत. तसेच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी केलेली कारवाई सार्वजनिक रित्या प्रसिद्धीस द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अन्यथा नियम सर्वसामान्यांसाठी आणि मुभा प्रभावशालींसाठी, असे चित्र निर्माण झाले तर प्रशासनावरील विश्वासालाच तडा जाईल. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकाचा विषय म्हणून न पाहता सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, वीज सुरक्षेचा प्रश्न आणि नियमांच्या समान अंमलबजावणीचा मुद्दा म्हणून पाहण्याची गरज आहे. वेळीच कठोर कारवाई झाली तरच पालखी महामार्गावरील विद्युत खांबांना भविष्यातील अनधिकृत फ्लेक्सबाजीपासून वाचवता येईल.
चौकट
आज वाढदिवसाचा फ्लेक्स, उद्या प्रत्येकाचा!
महावितरणच्या वीज खांबांचा अनधिकृत वापर आज दुर्लक्षित केला, तर उद्या याच खांबांवर फ्लेक्स-बॅनरची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी धोकादायक वीज खांबांचा वापर करणाऱ्यांवर वेळीच दंडात्मक कारवाई झाली नाही, तर हा प्रकार केवळ विद्रूपीकरणापुरता राहणार नाही; वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण करू शकतो. नियम असतील तर ते सर्वांसाठी समान असावेत, एवढीच नागरिकांची अपेक्षा!






