फलटण( आपलं फलटण )नागरिकांचे विविध शासकीय प्रश्न व प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी फलटण येथे सोमवार (दि. ७) तालुकास्तरीय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजा मंगल कार्यालय येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा जनता दरबार होणार आहे.
आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या जनता दरबारात तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी थेट उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर थेट मांडता येणार आहेत.
पोलीस, महसूल, नगरपालिका, आरोग्य, कृषी, वीज, पाणीपुरवठा तसेच विविध शासकीय योजना व विभागांशी संबंधित तक्रारी आणि प्रश्न नागरिकांना जनता दरबारात मांडता येतील. प्रलंबित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने व संबंधित कागदपत्रांसह जनता दरबारास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






