आपलं फलटण (समाधान कळसकर) :
फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच ऊसदर देण्यात येईल. तसेच आगामी गळीत हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शेंडे यांनी दिली.
टाकळवाडे, ता. फलटण येथे टाकळवाडे-निंबळक परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक जयपाल देवकाते, विजय तावरे, सतीश फाळके, रतनकुमार भोसले, विशाल जगताप, देवीदास गावडे, शेतकी अधिकारी निंबोरे तसेच अनिल जगताप यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
ऊसटंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध गळीत हंगाम
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखान्याचा कारभार ऊस उत्पादकांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे सुरू आहे. ऊसाची उपलब्धता व दुष्काळी परिस्थितीचा विचार करून कारखाना नियोजित वेळेत सुरू करण्यात येणार असून, कारखाना सुरू झाल्यापासूनच फलटण तालुक्यात ऊसतोडणीची व्यवस्था केली जाईल, असे शेंडे यांनी सांगितले.
वजनकाट्याबाबतच्या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये
फलटण तालुक्यात माळेगाव कारखान्याच्या वजनकाट्याबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवा पूर्णतः चुकीच्या असल्याचे सांगून, शेतकऱ्यांनी आपला ऊस खासगी वजनकाट्यावर वजन करून कारखान्याकडे पाठविल्यानंतर वजनाबाबत कोणतीही अडचण जाणवल्यास संचालक मंडळ त्याची तत्काळ दखल घेईल, अशी ग्वाहीही शेंडे यांनी दिली.
गेटकेन ऊस उत्पादकांनाही न्याय देणार
सभासद ऊस उत्पादकांप्रमाणेच गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर देण्याचा कारखान्याचा प्रयत्न राहणार आहे. गेटकेन सभासदांना कारखाना वाऱ्यावर सोडणार नाही. पहिल्या दिवसापासून गेटकेन ऊसाची तोडणी करण्याचे नियोजन असून, ऊसतोडणीदार, टोळीचालक अथवा वाहनमालकांना कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत, असे आवाहन शेंडे यांनी केले.
यावेळी टाकळवाडे व निंबळक परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या विविध अडचणी व मागण्या संचालक मंडळासमोर मांडल्या. संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. फुले यांनी मानले.





