आपलं फलटण प्रतिनिधी
फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना गुरुवारी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर देत रामराजे नाईक-निंबाळकर व त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला. सहकार, श्रीराम साखर कारखाना, मालोजीराजे बँक, दूध संघ, स्वराज शुगर, दत्त इंडिया, तालुक्याचा विकास तसेच वैयक्तिक आरोपांवर त्यांनी परखड भूमिका मांडली.
मी “खाजगी कारखाना काढल्यामुळे सहकार अडचणीत आला” असा सजीवराजे यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेताना रणजितसिंह म्हणाले, “मी खाजगी कारखाना काढला म्हणून सहकार संपला, हा आरोप हास्यास्पद आहे. संजीवराजेंनी सहकारी दूध संघ असताना स्वतःचा दूध व्यवसाय का सुरू केला? रामराजे व संजीवराजे यानी तासगाव येथे खाजगी साखर कारखाना काढण्याची घोषणा केली होती की नाही? स्वतः सर्व काही करायचे आणि दुसऱ्यावर बोट दाखवायचे, ही त्यांची पद्धत आहे.”
ते पुढे म्हणाले, “सहकारावर बोलण्याचा नैतिक अधिकार रामराजे आणि त्यांच्या बंधूंना नाही. दूध संघ, मालोजीराजे बँक, श्रीराम सोसायटी यांचे काय झाले, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे.”
रामराजेंनी केलेल्या “मल्ल्या” या उल्लेखावर संताप व्यक्त करत रणजितसिंह म्हणाले, “मला मल्ल्या म्हणणारे रामराजे हेच फलटणचे खरे ‘मल्ल्या’ आहेत. मालोजीराजे बँक बुडवणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे.”
स्वराज शुगरबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “माझा कारखाना महाराष्ट्रात नावारूपाला येत आहे. भारतातील सर्वात मोठा डिस्लरी प्रकल्प आणि जगातील १५० टन क्षमतेचा सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प आम्ही उभारत आहोत. ही प्रगती पाहूनच विरोधकांना अस्वस्थता येत आहे.”
“मुख्यमंत्री माझे मित्र; विकासामुळेच विरोधक अस्वस्थ”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री माझे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून फलटणला मोठमोठे प्रकल्प मिळत आहेत. विमानतळ, पाणीप्रश्न आणि इतर विकासकामांसाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. तालुक्यात विकासाची लक्ष्मी येत असताना काहींना त्याचे दुःख होत आहे.”
वैयक्तिक टीकेला उत्तर देताना रणजितसिंह म्हणाले, “बघून घेण्याची भाषा केली तर समजेल अशाच भाषेत उत्तर द्यावे लागेल. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. माझ्या नादाला लागाल तर पळता भुई थोडी करीन. असा सज्जड इशारा रणजीत सिंह यांनी रामराजेंना दिला. शिक्षकांकडून अडीच टक्के कमिशन कोण घेतय,शिक्षक व्यापाऱ्यांच्या ठेवी कुठे गेल्या? अकॅडमी, व्यापारी गाळे, शहरातील मोकळ्या जागा या सर्व बाबी बाहेर काढण्याची वेळ आली आहे.”
श्रीराम साखर कारखान्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी आरोप केला की, “श्रीराम कारखान्याबाबत न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली. गोपनीय जाहिराती देण्यात आल्या. दोनच टेंडर कसे आले? बैठकीपूर्वीच ‘दत्त इंडिया’ कारखाना चालवणार असल्याची माहिती तालुक्यात कशी पसरली? पत्रकार परिषद प्रसंगी आमदार सचिन पाटील ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील, शिवरुपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले नरसिंह निकम यांचे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती

जवाहर समूहावर दबाव टाकून करार मोडायला लावल्याचा आरोप फेटाळताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यानच जवाहर समूहाचे प्रमुख प्रकाश आवाडे यांना दूरध्वनी लावला.
यावेळी आवाडे यांनी स्पष्ट सांगितले की, “कारखाना सोडण्यासाठी आपण आमच्यावर कधीही दबाव आणला नाही. उलट प्रत्येक भेटीत कारखाना कसा चालला, काही अडचण आहे का, अशी विचारपूस करत होतात. कारखाना तुम्हीच चालवा, असा आग्रहही तुम्ही केला होता. मात्र आर्थिक अडचणी आणि वाढते नुकसान यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. करार मोडण्यासाठी राजकीय दबाव होता, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.”
“निंबाळकर घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तीचे वक्तव्य बालिश” – शिवरूपराजे खर्डेकर

पत्रकार परिषदेत शिवरूपराजे खर्डेकर यांनीही रामराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “निंबाळकर घराण्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने केलेले वक्तव्य अत्यंत बालिश आहे. ‘साठ वर्षे विषारी नाग जोपासला’ असे म्हणणे वास्तवाला धरून नाही. माझे वयच साठ वर्षे नाही. त्यामुळे हा आरोप किती तथ्यहीन आहे, हे स्पष्ट होते. त्यांनी तब्बल ३५ वर्षे सहकारात रामराजेंसोबत काम केले. १९९२ मध्ये त्यांना महत्त्वाच्या पदावर बसवण्यासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. श्रीराम साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा, यासाठी मी आग्रही भूमिका घेतली आहे तररणजितसिंह यांनीही नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे.”
पत्रकार परिषदेत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी तालुक्याच्या विकासासाठी आपण मोठे प्रकल्प आणत राहणार असल्याचा पुनरुच्चार करत, राजकीय टीकेला विकासाच्या कामातूनच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.





