आपलं फलटण वृत्तसेवा
पंचायत समिती फलटणची मासिक सभा सभापती शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभेच्या प्रारंभी खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सारसकल येथील प्रगतिशील शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांना विविध फळपिकांच्या लागवडीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘उद्यान पंडित २०२४’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
सभेमध्ये तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सज्ज राहून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, पंचायत समितीच्या सभेला वारंवार सूचना देऊनही काही विभागांचे अधिकारी गैरहजर राहत असल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागांनी भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळावा, अन्यथा त्यांच्याशी रितसर पत्रव्यवहार करून योग्य कार्यवाही करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला.
नूतन गटविकास अधिकारी अक्षय महादेव घावटे यांच्या उपस्थितीत झालेली ही पहिलीच मासिक सभा असल्याने पंचायत समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.
सभेला उपसभापती अमोल मस्ते, पंचायत समिती सदस्य-सदस्या, गटविकास अधिकारी अक्षय घावटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाशकुमार वांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.






