फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा ) फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध गांजा लागवडीविरोधात धडक कारवाई करत गुणवरे (ता. फलटण) येथील शेतातील गांजाची लागवड उध्वस्त केली. या कारवाईत सुमारे ७ किलो १४३ ग्रॅम वजनाचा व 34हजार 650 रुपयांचा गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दि. 25 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने गुणवरे येथील घुलेवस्ती परिसरात छापा टाकला. यावेळी घराजवळ आडोशाला लागवड केलेली गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, सपोनि शिवानी नागवडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष मठपती, शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, सागर अभंग, तुषार नलवडे, अमोल देशमुख अविनाश शिंदे यांच्या पथकाने केली.






