आपलं फलटण, प्रतिनिधी :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत धुळदेव गावात गोठ्याची व प्राण्यांच्या निवाऱ्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी कृषीकन्यांनी पशुपालकांना गोठ्यातील कचरा व जनावरांची विष्ठा नियमितपणे साफ करण्याचे महत्त्व सांगितले. जनावरांच्या वापरातील जागा स्वच्छ धुऊन निर्जंतुक करणे, गोठ्यात खेळती हवा व पुरेसा सूर्यप्रकाश राहील याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गोठ्याची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण केल्याने जनावरांमध्ये रोगांचा प्रसार कमी होतो, रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते, स्वच्छ व दर्जेदार दूध उत्पादन मिळते आणि पशुधनाचे आरोग्य चांगले राहते, अशी माहिती देण्यात आली.
या प्रात्यक्षिकाला गावातील पशुपालक व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वच्छ व निरोगी गोठा व्यवस्थापनामुळे पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो, असा संदेश कृषीकन्यांनी यावेळी दिला.
सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितिशा पंडित तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कृषीकन्या तेजश्री जाधव, वैभवी ननावरे, वैष्णवी वाघमारे, अस्मिता काटकर, सिद्धी धुमाळ, कावेरी पळसकर व सुवर्ण धिंदाळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले.





