फलटण (पुढारी वृत्तसेवा) नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाचे नेतृत्व फलटणचा सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी करत अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा तब्बल ११-१ अशा एकतर्फी फरकाने पराभव करून भारताला अजिंक्यपद मिळवून दिले.
या स्पर्धेत भारताने नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या संघांवर निर्विवाद वर्चस्व राखत संपूर्ण स्पर्धेत आपली ताकद सिद्ध केली. स्पर्धेतील तिन्ही साखळी सामने मोठ्या फरकाने जिंकून भारतीय संघ अजिंक्य राहिला स्पर्धेत एकही सामना भारत हरला नाही सर्वच सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशासह महाराष्ट्र, सातारा जिल्हा आणि विशेषतः फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
फलटणच्या ऐतिहासिक नगरीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे, अशी अभिमानास्पद कामगिरी लखन मोरे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने करून दाखवली आहे. या विजयामुळे फलटणसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात मलेशिया येथे तीन देशांदरम्यान सॉफ्ट हॉकी लिग सामने होणार असून भारतीय संघ त्यातही दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. तसेच २०२७ मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान होणारा पहिला सॉफ्ट हॉकी विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येणार असून जगातील १४ देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे भारतीय सॉफ्ट हॉकीसाठी ही मोठी ऐतिहासिक उपलब्ध मानली जात आहे.








