फलटण ( आपलं फलटण)
मठाचीवाडी (ता. फलटण) येथील सस्ते वस्तीवर मंगळवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. घराजवळील विहिरीत पडून ओम राजेंद्र सस्ते (वय ११) या सहावीतील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आणि परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर दुपारी चारच्या सुमारास घराजवळील विहिरीत पाण्यावर एक चेंडू तरंगताना दिसला. संशय आल्याने स्थानिकांनी विहिरीत शोध घेतला असता ओमचा मृतदेह आढळून आला. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच बरड दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस कर्मचारी सागर अभंग व अविनाश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
ओम हा अत्यंत हुशार, चुणचुणीत आणि सर्वांचा लाडका मुलगा होता. शाळेतही तो अभ्यासात पुढे असून निर्भीडपणे प्रश्न विचारणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
स्थानिकांच्या मते, सस्ते कुटुंबावर काळाने दुसऱ्यांदा घाला घातला आहे. काही वर्षांपूर्वी ओमच्या मोठ्या भावाचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा या दुर्दैवी घटनेने कुटुंबाला हादरवून सोडले आहे.
उमलत्या कळीप्रमाणे असलेले ओमचे आयुष्य अशा दुर्दैवी अपघातात संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने समाजमनही सुन्न झाले आहे.






