फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : युवा कलावंतांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आपल्या कलाविष्कारातून आधुनिक विचारांची अभिव्यक्ती करावी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवाव्यात, असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या वेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. व्ही. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे, विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेखा अडके, जिल्हा समन्वयक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आ. रामराजे पुढे म्हणाले कला हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाची सांस्कृतिक ओळख जपण्याचे प्रभावी माध्यम आहे. युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकारांतून आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. या संधीचा उपयोग करताना विद्यार्थ्यांनी पारंपरिक कलांचे महत्त्व ओळखून त्यात आधुनिक कल्पना आणि सर्जनशीलतेची भर घालावी.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या यजमानपदाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कलांच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. विविध महाविद्यालयांतील युवा कलावंतांच्या सहभागामुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण होते.






