फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एका महिलेसह ५५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तामखडा येथे पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बरड येथे आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तामखडा येथे टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
फलटण तालुक्यातील तामखडा गावातील पवारवाडी परिसरात गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अजय महादेव जाधव (वय ३३, रा. तामखडा) हे पत्नी प्रियांका जाधव यांच्यासह एमएच ११ सीएस ५५७६ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना दुचाकीचा तोल गेल्याने ती रस्त्याच्या कडेला गेली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एमएच ११ एम ४८२९ क्रमांकाच्या पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक बसली.
या अपघातात प्रियांका जाधव यांच्या पोटावरून टँकरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
बरड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
दुसरी घटना फलटण तालुक्यातील बरड येथे आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष मनोहर काकडे (वय ५५) हे महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या काकडे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातानंतर वाहनचालकाची माहिती मिळविण्याचे काम सुरू असून, याप्रकरणी पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.






