फलटण : शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मठाचीवाडी विद्यालय, मठाचीवाडीच्या मुलींच्या संघाने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश केला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीपासूनच चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना फलटण तालुका विरुद्ध माण तालुका असा रंगला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने निर्धारित वेळेनंतर सामना बरोबरीत सुटला.

त्यानंतर विजेता निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी पाच आक्रमणांची संधी देण्यात आली. या निर्णायक क्षणी मठाचीवाडी विद्यालयाच्या मुलींनी आपले कौशल्य, आत्मविश्वास आणि अचूक डावपेच दाखवत १४ विरुद्ध ४ अशा फरकाने बाजी मारली. या दमदार विजयासह मठाचीवाडी विद्यालयाच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय कबड्डी स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
या संघाला विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण शेंडगे, क्रीडा शिक्षक अमीर आतार, प्राची धनवडे, सतीश सोनलनकर, मज्जिद खान मुलानी, श्री. राज भोसले, महेश मुळीक व बाबू जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव राहुल कणसे, प्रशासनाधिकारी शिवलाल गावडे, मठाचीवाडीच्या सरपंच जयश्रीताई भोसले, उपसरपंच काकासाहेब कदम, के.के. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भैया कदम, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जगताप, पंचायत समिती सदस्य वनिता आढाव, निंबळक केंद्रप्रमुख चंद्रकांत दराडे, आदर्श शिक्षक संजय भोसले, मंगेश भैय्या भांडवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसले, कै. संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदराव जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
विजयी खेळाडूंची गावातून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मठाचीवाडी विद्यालयाच्या मुलींच्या या कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा अधिक बळकट झाली असून, विभागीय स्पर्धेतही संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.






