आपलं फलटण प्रतिनिधी :
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देत सभासदांच्या विश्वासाला बळ देण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या निराई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., गोखळीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या नव्या वास्तूमुळे संस्थेच्या कार्याला आधुनिक आणि सक्षम व्यासपीठ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या सहकाराच्या वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन सुशांत गावडे संस्थेचे सर्व संचालक तसेच परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोखळी-बारामती रोडवरील गोखळीपाटी, येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘सहकारातून सामूहिक विकास… विश्वासातून समृद्ध भविष्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून संस्थेने सभासदकेंद्री सेवा, सुरक्षित ठेवी, सुलभ कर्ज सुविधा आणि ग्रामीण भागाच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे नूतन वास्तू ही केवळ कार्यालयीन इमारत न राहता सभासदांच्या आर्थिक प्रगतीला दिशा देणारे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘आपला विश्वास—आमची जबाबदारी’ हा संदेश घेऊन सुरू झालेल्या या नव्या पर्वामुळे गोरखळी परिसरातील सहकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे सभासद, ठेवीदार, व्यापारी मजूर, शेतकरी, हितचिंतक, ग्रामस्थ आणि सहकारप्रेमींनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन निराई उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.






