आपलं फलटण प्रतिनिधी:
गणेशोत्सवाच्या उत्साहाला सर्जनशीलतेची आणि कलागुणांची जोड देत महिलांसाठी फलटणमध्ये भव्य ‘गौरी सजावट स्पर्धा’ आणि ‘बाप्पा विथ रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण, लायन्स क्लब फलटण, माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण, गगनगिरी ज्वेलर्स आणि इंद्राक्षी कलेक्शन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, महिलांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देतानाच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र व हमखास बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख गुरुवार, दि. १७ सप्टेंबर असून, इच्छुक महिलांनी तत्काळ नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गौरी सजावटीत सर्जनशीलतेला वाव
‘गौरी सजावट स्पर्धा’ फलटण शहर व परिसरासाठी मर्यादित आहे. या स्पर्धेत गौरीचा देखावा पौराणिक, ऐतिहासिक, पारंपरिक, समाजप्रबोधनपर अथवा इको-फ्रेंडली संकल्पनेवर आधारित असावा. स्पर्धेचे परीक्षण स्पर्धकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी गगनगिरी ज्वेलर्स यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास फॉर्मिंग नेकलेस, द्वितीय क्रमांकास बाजूबंद, तृतीय क्रमांकास मोती हार, चतुर्थ क्रमांकास आकर्षक देवमूर्ती, तर पाचव्या क्रमांकास गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे.
‘बाप्पा विथ रील’मधून भक्ती अन् समाजप्रबोधन
‘बाप्पा विथ रील स्पर्धा’ संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी खुली आहे. गणेशभक्ती, धार्मिक भावना किंवा समाजप्रबोधनपर आशय असलेला ३० ते ६० सेकंदांचा एचडी व्हिडिओ या स्पर्धेसाठी सादर करता येणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) निर्मित व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकास फॉर्मिंग नेकलेस, द्वितीय क्रमांकास पैठणी, तृतीय क्रमांकास देवमूर्ती, चतुर्थ क्रमांकास आकर्षक गिफ्ट हॅम्पर, तर पाचव्या क्रमांकास भेटवस्तू देण्यात येणार आहे.
दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेश फी प्रत्येकी १५० रुपये स्वतंत्र असून, इच्छुकांनी नियम व अटींची माहिती घेऊन सहभाग नोंदवावा.
या क्रमांकांवर साधा संपर्क
असिफा शिकलगार – 8010239062
नंदा बोराटे – 9766000320
रुपाली कचरे – 9226720881
प्रिया सस्ते – 9284274913
नीता दोशी – 9420999917
मनीषा घडिया – 7020467682
सुवर्णा शिंदे – 7498618183
उज्वला गोरे – 8484033142
अनुराधा रणवरे – 8668336313
गणेशोत्सवातील महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






