फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा )हात उसने घेतलेले पैसे परत मागितल्यावर खात्यात शिल्लक नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सरडे (ता. फलटण) येथील सुरेश माणिक मोरे याला फलटण येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच लाख रुपये नुकसानभरपाई आणि पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. एस. खेडकर-गोयल यांनी हा निकाल दिला.
याबाबत न्यायालयातून मिळालेली माहिती अशी की, सरडे येथील दत्तात्रय सखाराम भोसले यांनी ओळखीतील सुरेश माणिक मोरे याला सुमारे सव्वादोन लाख रुपये हात उसने दिले होते. ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने भोसले यांनी वारंवार मागणी केली. त्यानंतर मोरे यांनी खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही भोसले यांना धनादेश दिला. मात्र संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो ‘बाऊन्स’ झाला.
याप्रकरणी दत्तात्रय भोसले यांनी न्यायालयात परक्राम्य लिखत अधिनियम 1881 च्या कलम 138 अंतर्गत दावा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गुणवरे शाखेच्या शाखाधिकारी योगिता साळुंखे यांच्यासह अन्य साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. न्यायालयाने कागदपत्रे, साक्षी आणि पुराव्यांची पडताळणी करून आरोपी सुरेश मोरे याला दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीस फिर्यादी दत्तात्रय भोसले यांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला असून, त्यासोबत पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ही रक्कम वेळेत न भरल्यास आणखी एक महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात फिर्यादी दत्तात्रय भोसले यांना अॅड. निलेश भोसले यांनी सहकार्य केले, तर अॅड. उमेश कदम यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करून फिर्यादीची बाजू मांडली.






