फलटण (आपलं फलटण) वनविभागाच्या विविध सेवा आता नागरिकांना अधिक सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी फलटण वनविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात वनसेवा केंद्र सुरू करण्याच्या उपक्रमांतर्गत फलटण येथे तसेच आदर्की येथे दोन वनसेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक दिंगबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वनविभागाच्या सेवा थेट गावपातळीपर्यंत पोहोचवून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
लोकसेवा हमी कायद्यांतर्गत वनविभागाच्या तब्बल 13सेवा या केंद्रामार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यामध्ये वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पशू नुकसानीची भरपाई, पिकांच्या नुकसानीची भरपाई, वनक्षेत्रातील मालकी वृक्षतोड, वनजमिनीवरील नाहरकत प्रमाणपत्र आदी महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. संबंधित सेवांबाबतची माहिती देऊन प्रस्ताव स्वीकारण्याचे कामही या केंद्रांमधून करण्यात येणार आहे.
गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने वनसेवा केंद्र हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असून नागरिकांना कमी वेळेत आणि एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध होणार आहेत. फलटण तालुक्यातील नागरिकांनी वनविभागाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी फलटण येथील वनसेवा केंद्र तसेच आदर्की, गिरवी नाका येथील केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटेकर यांनी केले आहे.






