फलटण (आपलं फलटण) मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथे शासनाने मंजूर केलेले ‘पुस्तकाचे गाव’ अधिक समृद्ध व्हावे आणि येथून वाचनसंस्कृतीची ज्योत संपूर्ण महाराष्ट्रात प्रज्वलित व्हावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १८० व्या पुण्यतिथीनिमित्त पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी माणूसकी फौंडेशन चे अध्यक्ष प्रसाद मालपेकर, सचिव सुहास मालुसरे तसेच सुधाकर जांभेकर उपस्थित होते.
बेडकिहाळ म्हणाले, “ग्रंथालय आणि पुस्तक यांचा बाळशास्त्रींच्या जीवनाशी अतूट संबंध होता. त्यामुळे त्यांच्या जन्मगावी ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना राबविण्याचा शासनाचा निर्णय दूरदृष्टीचा आहे. आजच्या तरुण पिढीत वाचनाची सवय कमी होत असल्याने आता पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.”
योजना माणूसकी फौंडेशन मार्फत राबविण्यात येणार असून, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आपण त्रिखंडात्मक चरित्रग्रंथ लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रसाद मालपेकर यांनी बाळशास्त्रींच्या स्मृती जपण्यासाठी विशेष पुस्तिका आणि माहितीपट तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पोंभुर्ले येथे अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन माहिती केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रा. बाजीराव जांभेकर यांनीही बाळशास्त्रींच्या विचारांची चळवळ पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले, तर आभार रोहित वाकडे यांनी मानले.
या प्रसंगी सौ. अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, भारद्वाज बेडकिहाळ, सौ. निलम वाकडे, सौ. नुपुर बेडकिहाळ, संजय चोरमले, कृष्णात बोबडे, चित्रकार राहुल परब, यामेश खवणेकर यांच्यासह पोंभुर्ले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






