फलटण( आपलं फवटण) दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या फलटण नगरीत महानुभाव पंथीयांच्या परंपरेतील घोड्याच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून, आज मंगळवार, दि. ७ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. शहरातील श्रीकृष्ण देवस्थान परिसरासह विविध मंदिरांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
महानुभाव पंथीयांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या यात्रेनिमित्त श्री आबासाहेब मंदिर, श्री चक्रपाणी (जन्मस्थान), श्री दत्त मंदिर (मळवण) यांसारख्या प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची मोठी वर्दळ सुरू आहे. श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक फलटणमध्ये दाखल झाले आहेत. शहरातील मंदिर परिसर व आश्रमांमध्ये निवास, भोजन, पाणी आणि आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यात्रेचा मुख्य सोहळा आज मंगळवारी सकाळी पार पडणार आहे. सकाळी मानकरी पिवळ्या घोड्याला सजवून वाजत-गाजत मिरवणुकीने बाणगंगा नदीकाठी नेतील. तेथे पारंपरिक पद्धतीने स्नान, पूजन व आरती करण्यात येईल. त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात संपूर्ण शहर दुमदुमणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही आवश्यक ती सुरक्षा व सोयीसुविधांची तयारी केली आहे.
यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.






